सोने उतरणार नाही, तज्ञांचा निर्वाळा

फोटो सौजन्य फायनान्शियल टाईम्स

काही महिन्यांपूर्वी ५६ हजार प्रती दहा ग्रामची पातळी गाठलेल्या सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत असली तरी सोन्याचे भाव फार उतरणार नाहीत असा निर्वाळा गुंतवणूक जाणकार देत आहेत. करोना महामारीमुळे जगभरातील शेअर बाजार धराशाई झाले होते तरी पुन्हा एकदा शेअर बाजार वर चढू लागल्याचे दिसू लागले आहे. फेब्रुवारीतील पातळीवर शेअर निर्देशांक पोहोचले असून भारत त्याला अपवाद नाही. यामुळे सोने दर उतरू लागले असल्याची चर्चा सुरु असली तरी विश्लेषक मात्र हे मान्य करण्यास तयार नाहीत.

गुंतवणूक जाणकार आणि बाजार विश्लेषक यांच्या म्हणण्यानुसार सोने भावात घसरण होत असली तरी त्यासाठी केवळ शेअर बाजार वधारला हे एकमेव कारण नाही. अन्य कारणे सुद्धा आहेत. करोना काळात शेअर बाजार इतक्या वेगाने कोसळले की जगातील कोणतेच सरकार ते थोपवू शकले नाही. त्यामुळे भारत सरकारने २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर करणे, बँक व्याजदर घटविणे अशी उपाय योजना केली असली तरी आता शेअर बाजारात दिसत असलेली वाढ नैसर्गिक नाही.

दुसरी बाजू पाहायची तर सोन्याचे दर २००७ मध्ये ९ हजार रुपये प्रती १० ग्राम होते ते २०१६ मध्ये ३१ हजारावर गेले. ही वाढ तिप्पट आहे. सर्वसाधारण बँकेचे व्याजदर घटले की सोन्यात गुंतवणूक वाढते. शेअर बाजार घसरला की सोन्याचे दर वाढतात. भारतात सोने हे गुंतवणूकदरांची पहिली पसंती आहे. आत्ता सोने दर उतरण्यामागे गेल्या दोन महिन्यात डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेला रुपया हे कारण आहे.

सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत ७२-७३ वर आहे. तो दोन महिन्यापूर्वी ७६-७७ वर होता. डॉलर पुन्हा तेजीत आला की सोने दर वाढतील आणि पुढील वर्षात ते प्रती दहा ग्राम ६० ते ७० हजारावर जातील असा अंदाज वर्तविला जात आहे.