धक्कादायक! मे पर्यंत 64 लाख लोकांना झाला होता कोरोना, आयसीएमआरच्या सर्वेक्षणात खुलासा


देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र आयसीएमआरच्या एका सर्वेक्षणामधील धक्कादायक खुलासा समोर असून, देशात मे महिन्यापर्यंतच जवळपास 64 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती समोर आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सिरो सर्वेक्षणामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वेक्षणानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला 0.73 टक्के म्हणजेच 64 लाख (64,68,388) लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले होते. प्रत्येक आरटी-पीसीआर चाचणीत एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यावेळी देशात लॉकडाऊन होता. सीरो सर्वेक्षणानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नव्हते, तेथेही सर्वेक्षणात संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. रिपोर्टनुसार, ज्या जिल्ह्यात कोणतेही रुग्ण नव्हते अथवा कमी होते. यामागचे कारण तेथे टेस्टिंगचे प्रमाण कमी असणे हे होते किंवा लॅबपर्यंत पोहचणे शक्य नव्हते.

सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक 69.4 टक्के, शहरी झोपडपट्टी भागत 15.9 टक्के आणि शहरी भागात 14.6 टक्के होते. याशिवाय वयोगटानुसार सांगायचे तर या रुग्णसंख्येमध्ये 18 ते 45 वयोगटातील 43.3 टक्के लोकांना मेपर्यंत कोरोनाची लागण झाली होती. 46 ते 60 मध्ये 39.5 टक्के  आणि 60 वर्षांपेक्षा अधिकचे 17.2 टक्के कोरोनाबाधित होते.

सीरो सर्वेक्षण 11 मे ते 4 जून दरम्यान करण्यात आले. यात 18 पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे नमुने घेण्यात आले. देशातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यातील 700 गाव आणि वॉर्डमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास 28 हजार नमुने घेण्यात आले होते.