‘तुमचे सरकार महिलांचा छळ करत आहे’, कंगनाने आता सोनिया गांधींना खेचले वादात


मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. आता कंगनाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना देखील या वादात खेचले आहे. तुमच्या सरकारला डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती करू शकत नाही का?, असा सवाल कंगनाने सोनिया गांधींना विचारला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर करत कंगनाने त्यांना शिवसेनेची सध्याची स्थिती पाहून काय वाटत असेल ? असा सवाल केला. यानंतर कंगना सोनिया गांधींवर निशाणा साधत  म्हणाली की, आदरणीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, एक महिला असल्याच्या नात्याने तुम्हाला महाराष्ट्रात तुमच्या सरकारने माझ्यासोबत केलेल्या व्यवहाराबाबत दुःख होत नाही ? तुम्ही डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती तुमच्या सरकारला करू शकत नाही का?

आणखी एक ट्विट करत कंगना म्हणाली की, तुम्ही पाश्चात्य देशात मोठ्या झाला आहात आणि भारतात राहत आहात. तुम्हाला महिलांच्या संघर्षाची नक्कीच जाणीव असेल. तुमचे सरकार एका महिलेचा छळ करत आहे आणि कायद्या आणि सुव्यवस्थेची चेष्टा चालवली आहे, अशा स्थिती तुमच्या शांत राहण्याचा आणि भेदभाव करण्याच्या वृत्तीचा इतिहास न्याय करेल. मला आशा आहे की तुम्ही यात हस्तक्षेप कराल.