चीनची चिंता वाढणार, भारत-जपानने केला महत्त्वपुर्ण लष्करी सहकार्य करार


भारत-जपानमध्ये महत्त्वपुर्ण करार झाला असून, यामुळे चीनची चिंता वाढवू शकते. भारत-जपानमध्ये सैन्य दलांचा पुरवठा आणि सेवांच्या आदान-प्रदानबाबत करार झाला आहे. म्हणजेच युद्धाच्या स्थितीत भारत-जपान एकमेकांना लष्करी सहकार्य करतील. याआधी भारताने अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासोबत असा करार केलेला आहे. भारतीय संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुजुकी सतोशी यांनी म्युच्यूअल लॉजिस्टिक सपोर्ट अरेंजमेंटवर (एमएलएसए) स्वाक्षरी केली.

एलएसीवर सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने हिंद महासागरात चीनला घेरण्यास सुरुवात केली आहे. भारत-जपानमध्ये झालेल्या या संरक्षण कराराला ऐतिहासिक मानले जात आहे. या करारानंतर पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी फोनवर देखील चर्चा केली.

भारत-जपानमध्ये राजकीय संबंध आधीपासूनच आहेत, मात्र चीनसोबतच्या तणावाच्या स्थितीमध्ये झालेला हा करार हिंद महासागरात भारताची ताकद वाढवेल व चीनला रोखण्यास मदत होईल. या करारानंतर भारतीय सैन्य जपानच्या लष्कराचे तळ वापरू शकेल. सोबतच संरक्षण संबंधी सामानांचा देखील पुरवठा करेल. हीच सुविधा भारतीय लष्करी तळावर जपानच्या सैन्याला देखील मिळेल.

जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत सांगितले की, हा करार दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये एका घनिष्ठ सहकार्याला प्रोत्साहन देईल. भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, भारत आणि जपानच्या सशस्त्र दलांमधील परस्पर सहकार्य वाढल्यामुळे देशांमधील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीत द्विपक्षीय संरक्षण क्रियेत आणखी वाढ होईल.