दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ अडचणीत, घातली जाऊ शकते बंदी


दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघांवर बंदीची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. तेथील सरकारने क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाला निलंबित केले आहे. सरकारचे हे पाऊल आयसीसीच्या नियमांविरोधात आहे. नियमानुसार कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डमध्ये तेथील सरकारचा हस्तक्षेप नसावा. मात्र आता दक्षिण आफ्रिकेतील सरकार क्रिकेट बोर्डालच निलंबित केल्याने, या संघावर आयसीसी बंदी घालण्याची शक्यता आहे.

मागील अनेक दिवसांपासून बोर्ड वर्णभेद, भ्रष्टाचार आणि खेळाडूंचे वेतन यासारख्या वादांचा सामना करत होते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिडा आणि ऑलिम्पिक कमेटीने पत्र लिहून बोर्डाच्या सर्व अधिकाऱ्यांना पदावरून हटण्यास सांगितले आहे. ही कमेटी दक्षिण आफ्रिकेत सरकार आणि स्पोर्ट्स फेडरेसशमधील मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असते. या कमेटीने मागील वर्षी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या घोटाळ्यांची चौकशी सुरू केली होती. या चौकशीचे परिणाम समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही क्रिकेट खेळणाऱ्या संघाचे व्यवस्थापन पाहणारी संस्था ही स्वतंत्र हवी. त्या संस्था अथवा बोर्डावर सरकारचे नियंत्रण नसावे. बोर्डाला निलंबित करणारी दक्षिण आफ्रिकेची कमेटी ही त्या देशातील सरकारचा भाग आहे. हे आयसीसीच्या नियमांविरोधात असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घातली जाऊ शकते.

याआधी 1970 ते 1990 च्या काळात वर्णभेदामुळे देखील या संघावर बंदी घालण्यात आली होती.