कोरोना रोखण्यासाठी उत्तर कोरियाने दिले गोळ्या घालण्याचे आदेश, अमेरिकेचा दावा


जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र उत्तर कोरियाने आपल्या देशात आतापर्यंत एकही कोरोनारुग्ण आढळला नसल्याचे म्हटले आहे. यातच आता अमेरिकेच्या सैन्य कमांडरने दावा केला आहे की उत्तर कोरियाने चीनमधून आपल्या देशात कोरोना संक्रमित प्रवेश करू नये यासाठी थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

नॉर्थ कोरियाने कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता जानेवारी महिन्यातच चीनशी लागून असलेली सीमा बंद केली होती. जुलैमध्ये येथील स्थिती अधिक कठोर करण्यात आली. अमेरिका फोर्स कोरियाचे कमांडर रॉबर्ट अब्राहम्स म्हणाले की, बॉर्डर बंद असल्याने सामानांची तस्करी वाढली आहे. यामुळे आता प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागत आहे.

एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना रॉबर्ट अब्राहम्स म्हणाले की, दक्षिण कोरियाने चीनच्या सीमेला लागून असलेल्या 2 किमी भागाला बफर झोन बनवले आहे. तेथे उत्तर कोरियाच्या स्पेशल ऑपेरशन्स फोर्सला तैनात करण्यात आले आहे. त्यांना कोणीही दिसताच थेट गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, सीमा बंद असल्याने चीनवर आर्थिक परिणाम होत आहे. चीनच्या आयातमध्ये 85 टक्के घट आली आहे.