रामदास आठवले कंगनाला भेटले, राजकारणात येण्याचे आमंत्रण

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिची तिच्या राहत्या घरी भेट घेतली. बीएमसीने कंगनाचे कार्यालय पाडल्यावर आठवले यांनी कंगनाच्या खार येथील राहत्या घरी भेट घेऊन मुंबईत सुरक्षेची काळजी करू नये असे सांगितले तसेच तिला राजकारणात यायचे असल्यास बीजेपी किंवा आरपीआय मध्ये तिचे स्वागत असल्याचे सांगितले. बीएमसीने केलेल्या कारवाईत कंगनाचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.

आठवले या भेटीविषयी माहिती देताना म्हणाले कंगना जेव्हा मुंबई विमानतळावर उतरली तेव्हाच आम्ही तिला सुरक्षा देण्याची तयारी दाखविली होती. कंगनाने तिला राजकारणात रस नसल्याचे स्पष्ट केले आणि जोपर्यंत अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे तोपर्यंत राजकारणाशी संबंध ठेवणार नसल्याचे सांगितले असे आठवले म्हणाले. आठवले यांनी कंगनाशी एक तास चर्चा केली. मुंबई सर्वांची आहे असे सांगून आपला पक्ष तिच्यासोबत असल्याचेही तिला सांगितले. मात्र कंगनाने मुंबई किंवा महाराष्ट्र सरकार विषयी जी विधाने केली त्याच्याशी मी सहमत नाही असा खुलासा आठवले यांनी केला आहे.