अमेरिकन कार्गो स्पेस क्राफ्टचे कल्पना चावला असे नामकरण

भारतीय वंशाची अंतराळ संशोधक आणि अंतराळवीर कल्पना चावला हिला सन्मान देण्यासाठी अमेरिकन व्यावसायिक कार्गो स्पेसक्राफ्टचे नामकरण एसएस कल्पना चावला असे केले गेल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. अमेरिकन स्पेस कंपनी नॉर्थरोप ग्रूमन यांनी त्यांच्या आगामी सिग्नस कॅप्सूलचे नाव एसएस कल्पना चावला असे केल्याची जाहीर केले. कल्पनाच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. हे यान २९ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून लाँच केले जात असून या मिशनचे नाव एनजी-१४ असे आहे. हे यान दोन दिवसात अंतराळ संशोधन केंद्रावर पोहोचणार आहे.

२००१ मध्ये कोलंबिया स्पेस मिशन पूर्ण करून पृथ्वीवर परत येत असताना हे यान हवेतच क्रॅश होऊन जळून गेले होते. त्यात कल्पना सह अन्य पाच अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते. कल्पना ही अंतराळात झेप घेणारी भारतीय वंशाची पहिली अंतराळवीर होती आणि नासा मध्ये कार्यरत होती. नॉर्थरोप ग्रूमन कंपनीने त्याच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनी त्यांच्या स्पेस क्राफ्टला अंतराळ क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या संशोधकांचा सन्मान करण्यासाठी त्यांची नावे देते.

कल्पना चावला हिचा जन्म हरियाणातील कर्नाल येथे १७/३/६२ रोजी झाला होता. भारतात एरोनॉटिक विषयात अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली होती. नासा मध्ये कार्यरत असताना तिने २००१ पूर्वी सुद्धा अंतराळ प्रवासाचे एक मिशन पूर्ण केले होते.