रिलायंस रिटेल मध्ये ४० टक्के हिस्सा खरेदी करणार अमेझॉन?

रिलायंस उद्योगसमूहाची उपकंपनी रिलायंस रिटेल ४० टक्के हिस्सा अमेझॉन कंपनीला विकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या उद्योग क्षेत्रात सुरु असून हा करार २० अब्ज डॉलर्सचा असेल असे सांगितले जात आहे. हा करार खरोखरच झाला तर भारतातील कंपनीत परदेशी कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. वृत्तपत्र वाहिन्यातून येत असलेल्या बातम्यांनुसार या संदर्भात रिलायंस आणि अमेझॉन याच्यात बोलणी झाली आहेत.

रिलायंस किंवा अमेझॉनने मात्र या संदर्भात काहीही माहिती दिलेली नही. रिलायंस कडून या संदर्भात इमेलने खुलासा केला गेला असल्याचे समजते. त्यानुसार कंपनीचे अश्या प्रकरच्या करारांवर सहमती किंवा नकार न कळविण्याचे धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. जी माहिती देणे अनिवार्य आहे ती कंपनी वेळोवेळी देत असते असाही खुलासा यात केला गेला आहे. मिडीयाने खात्री करून घेतल्याशिवाय अश्या बातम्या देऊ नयेत अशीही सूचना यात केली गेली आहे.

विशेष म्हणजे रिलायंस रिटेलने गेल्या महिन्यात अधिग्रहण केलेल्या फ्युचर ग्रुप मध्ये अमेझॉनची आधीपासूनच गुंतवणूक आहे. रिलायंस रिटेलने बुधवारी १.७५ टक्के हिस्सा अमेरिकन कंपनी सिल्व्हर लीफला ७५०० कोटी रुपयात विकला असल्याची घोषणा झाली आहे. रिलायंस रिटेल कडून अशी आणखी हिस्सा विक्री होऊ शकते असे संकेत दिले गेले आहेत.