क्रिस गेलला आयपीएल मध्ये नवे रेकॉर्ड करण्याची संधी

युएई मध्ये सुरु होत असलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाब कडून खेळत असलेल्या क्रिस गेल याला आणखी एक अनोखे रेकॉर्ड बनविण्याची संधी आहे. आयपीएल टी २० मध्ये गेलने नोंदविलेल्या रेकॉर्डवर नजर टाकली तर तो किती खतरनाक फलंदाज आहे याची सहज कल्पना येऊ शकते. पुन्हा एकदा आयपीएल मध्ये नवा इतिहास नोंदविण्याची संधी तो साधतो का याकडे आता क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी गेल याला आयपीएल टी २० मध्ये सर्वाधिक म्हणजे १००० षटकार मारणारा फलंदाज होण्याची संधी आहे. त्याच्या नावावर आत्तापर्यंत ९७८ षटकार असून १ हजाराचा आकडा गाठण्यासाठी त्याला फ़क्त २२ षटकार हवे आहेत. ही कामगिरी त्याने केली तर तो अशी कामगिरी करणारा जगातील पाहिला खेळाडू बनणार आहे.

गेलच्या नावावर टी२० प्रारूपात सर्वाधिक १०२६ चौकार मारण्याचे रेकॉर्ड आहे. आयपीएलचा विचार करायचा तर एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम गेल याच्याच नावावर असून त्याने २०१३ मध्ये आरसीबी तर्फे पुण्याविरूढ खेळताना १७५ नाबाद धावात १७ षटकार ठोकले होते. टी२० मध्ये त्याने सर्वाधिक १८ षटकार ठोकले असून हा सुद्धा विक्रम आहे. टी २० मध्ये सर्वाधिक १३२९६ धावा, सर्वाधिक २२ शतके, सर्वाधिक ८२ अर्थशतके, एका डावात नाबाद १७५ चा बेस्ट स्कोर, सर्वाधिक वेगवान शतक (३० चेंडू), कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (२०१५ सालात १६६५ धावा) आणि सर्वाधिक म्हणजे ५८ वेळा सामनावीर( मॅन ऑफ द मॅच) अशी रेकॉर्ड गेलच्या नावावर आहेत.