करोना संक्रमित दोन कैदी येरवडा जेल मधून फरारी

गुरुवारी पुण्याच्या मध्यवर्ती येरवडा जेल मधून दोन करोना संक्रमित कैदी फरारी झाल्याचे समजते. अनिल वेताळ आणि विशाल खरात अशी त्यांची नावे असून त्यापैकी वेताळ याच्यावर मारहाण आणि लुटमारीचा आरोप आहे तर खरात याच्यावर शिरूर येथील पोलीस ठाण्यात खून केल्याची तक्रार दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या दोघांना न्यायालयात हजर करून त्यांच्यासाठी न्यायालयीन कोठडी घेतली गेली होती. त्यांना येरवडा जेल मध्ये आणले तेव्हा त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने येरवडा जेल जवळच तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या कोविड सेंटर मध्ये कोठडीत ठेवले गेले होते. या सेंटर मध्ये एकूण २० कैदी असून खरात आणि वेताळ यांनी खोलीच्या खिडकीचे गज तोडून पलायन केल्याचे समजते.

दोन महिन्यापूर्वी याच प्रकारे येरवडा जेल मधून पाच कैदी ग्रील तोडून पळाले होते त्यापैकी तिघांवर खुनाचा आरोप होता आणि त्यांच्यावर मोक्का लावला गेला होता. मात्र तीन दिवसातच हे सर्व पाच कैदी पोलिसांनी परत पकडले होते. पोलिसांनी नुकतेच पळून गेलेले कैदी कुणाला आढळले तर त्वरीत पोलिसांना कळविण्याचे आवाहन जनतेला केले आहे.