कंगना प्रकरण संपले, ठाकरे भेटीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राउत चे पाली हिल येथील कार्यालय अवैध बांधकाम केल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेने तोडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना घेरली गेली असतानाचा गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत बॅकफुटवर गेल्याचे दिसून आले. संजय राऊत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर राऊत याना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी कंगना एपिसोड संपला असल्याचे आणि आम्ही तो विषय विसरून गेलो असल्याचे सांगितले. तसेच ठाकरे यांची भेट पक्षातील काही अडचणी, दैनिक, सरकारी आणि सामाजिक कामे या संदर्भात होती असाही खुलासा केला.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी कंगना प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. या भेटीपूर्वीच पवार यांनी कंगनाच्या ऑफिस वर करण्यात आलेल्या कारवाई विषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे- पवार भेटीत या विषयावर चर्चा झाली आणि कंगना प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया शिवसेनेने देऊ नये तसेच कंगनाच्या ऑफिस वर केल्या गेलेल्या कारवाईची जबाबदारी बृहन मुंबई महापालिकेवर सोपवावी आणि त्यात कोणताही हस्तक्षेप सरकारने करू नये या मुद्द्यावर सहमती झाली होती.

संजय राऊत याना कंगना प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार नाराज असल्याचे विचारले गेल्यावर त्यांनी माध्यमांना मिळालेली ही माहिती चुकीची असल्याचे सांगून या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही असे उत्तर दिले.