अमेरिकेसाठी ११ सप्टेंबर म्हणून संस्मरणीय

जगातील सर्वात मोठा भीषण दहशतवादी हल्ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी केला गेला आणि त्यात हे जुळे टॉवर जमीनदोस्त झाले त्याला आज १९ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात ७० देशातील ३००० नागरिक ठार झाले होते. याच दिवशी अमेरिकन लष्करी यंत्रणा पेंटागॉनवर सुद्धा एक विमान दहशतवाद्यांनी धडकविले होते. अमेरिकेवरील या ऐतिहासिक हल्ल्यात १९ दहशतवादी सामील होते. या हल्ल्याचा मास्टरमाईंड अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्यावर अमेरिकेने २.५ कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले होते आणि २ मे २०११ रोजी ओसामा याला पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घुसून अमेरिकन सील कमांडोनी ठार केले होते.

न्युयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे बांधकाम १९६६ मध्ये सुरु झाले होते आणि ही अतिप्रचंड इमारत १९७३ साली बांधून पूर्ण झाली होती. या इमारतीत १८ हजार कर्मचारी काम करत असत.

याच्या बरोबर विरुद्ध घटना ११ सप्टेंबर १८९३ रोजी घडली होती. त्या दिवशी विश्व धर्म संमेलनात भारताचे अध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या भाषणाने जगावर एक न पुसता येणारा ठसा उमटविला होता. आज १२७ वर्षे उलटल्यावर सुद्धा विवेकानंदांचे भाषण जनमानसावर तसेच ठसलेले आहे. या भाषणाची सुरवात स्वामी विवेकानंदानी ‘माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ अशी करून पाश्चिमात्य देशांना भारतीय संस्कृती, सहिष्णुता यांचे नवे दर्शन घडविले होते. स्वामीच्या या भाषणाने भारताची प्रतिमा उज्ज्वल केली होती.

याशिवाय याच दिवशी अमेरिकेच्या इतिहासात आणखी काही घटना घडल्या आहेत. ११ सप्टेंबर २०११ रोजीच अमेरिकन लष्कराचे मुख्यालय पेंटागॉनचे बांधकाम सुरु झाले होते. तसेच ११ सप्टेंबर २००३ मध्ये चीनच्या विरोधाला न जुमानता तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची भेट अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतली होती.