सुरक्षेला धोका असल्याचे सांगत अमेरिकेने 1000 चीनी नागरिकांचा व्हिसा केला रद्द


मागील अनेक दिवसांपासून अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे. यातच आता अमेरिकेने जवळपास 1000 चीनी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. व्हिसा रद्द करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी आणि संशोधक आहेत. अमेरिकेच्या होमलँड सिक्यूरिटीचे प्रमूख चॅड वोल्फ यांनी याबाबत माहिती दिली आहे. मे महिन्यात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली होती. यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

वोल्फ यांनी सांगितले की,  चीनी लष्कराशी संबंध असलेल्या विद्यार्थी आणि संशोधकांना अमेरिकेने व्हिसा देणे बंद केले होते. अमेरिकेचा आरोप आहे की हे विद्यार्थी महत्त्वपुर्ण संवेदनशील संशोधन चोरी करतात.

त्यांनी पुन्हा एकदा चीनवर अन्याकारक व्यवसायिक व्यवहार, औद्योगिक हेरगिरी आणि कोरोना व्हायरस संशोधन चोरण्याच्या प्रयत्नांचे आरोप केले. तसेच, चीन अमेरिकेद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या व्हिसाचा दुरुपयोग करत असल्याचे म्हटले आहे.

चीनमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख करत वोल्फ म्हणाले की, अमेरिका चीनद्वारे गुलाम मजुरांचा वापर करून उत्पादन करत असलेल्या वस्तूंवर देखील बंदी घालणार आहे. चीनने प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याची देखील त्यांनी मागणी केली.