मोठा धक्का! सीरम इंस्टिट्यूटने रोखले भारतातील ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचे ट्रायल


भारतासह संपुर्ण जगाला आशा असलेल्या ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाद्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचे क्लिनिकल ट्रायलर अखेर भारतात देखील सीरम इंस्टिट्यूटकडून थांबविण्यात आले आहे.  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून पुढील निर्देश येईपर्यंत हे ट्रायल रोखण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय सीरम इंस्टिट्यूटकडून घेण्यात आला आहे. याआधी अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत या लसीचे ट्रायल रोखण्यात आले आहे.

या लसीच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान ब्रिटनमध्ये एका स्वयंसेवकाला साइड इफेक्ट्स जाणवले होते. त्यामुळे अमेरिकसह इतर देशांनी ट्रायल रोखले होते. मात्र भारतातील या लसीचे ट्रायल रोखण्यात आले नव्हते. याबाबत डीसीजीआयने सीरम इंस्टिट्यूटला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.

डीसीजीआयने नोटीसमध्ये म्हटले आहे की, जोपर्यंत रुग्णाच्या सुरक्षेची खात्री पटत नाही, तोपर्यंत तुम्हाला देण्यात आलेली क्लिनिकल ट्रायलची परवानगी का रोखण्यात येऊ नये? अखेर आता नोटीसनंतर सीरम इंस्टिट्यूने क्लिनिकल ट्रायल रोखले आहे. भारतात ऑक्सफोर्डच्या लसीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल 17 ठिकाणी सुरू होते.