परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमनपदी नियुक्ती


प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे माजी लोकसभा खासदार असलेले परेश राव आता एनएसडीचा कार्यभार स्विकारतील. परेश रावल हे प्रसिद्ध राजस्थानी कवी अर्जुन देव चरण यांची जागा घेतील. अर्जुन देव चरण यांना 2018 साली एनएसडीचे चेअरमन बनविण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी परेश रावल यांच्या नियुक्तीची माहिती ट्विटवर दिली. त्यांनी ट्विट केले की, प्रसिद्ध कलाकार माननीय परेश रावल यांना राष्ट्रपतींद्वारे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या प्रतिभेचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. हार्दिक शुभेच्छा.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याबाबत ट्विट करत माहिती देण्यात आली व परेश रावल यांचे एनएसडी कुटुंबात स्वागत असल्याचे म्हटले आहे.

आपल्या नियुक्तीवर ते म्हणाले की, हे आव्हानात्मक मात्र मजेशीर असेल. मी माझ्यातर्फे सर्वेश्रेष्ठ करेल. कारण हे असे क्षेत्र आहे ज्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. दरम्यान, परेश रावल हे भाजपच्या तिकिटावर अहमदाबाद ईस्टचे खासदार देखील राहिलेले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.