मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण


देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकप्रतिनिधी लोकांची मदत करण्यासाठी पुढे येत आहे. मात्र यामुळे त्यांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. यातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पेडणेकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली असून, त्यांनी स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे.

किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली.

आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, असेही पेडणेकर म्हणाल्या.

पेडणेकर यांनी कुटुंबातील सदस्यांची देखील कोरोना चाचणी केली असल्याची माहिती दिली. मात्र त्यांच्या रिपोर्टबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.