मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे कंगनाला महागात, तक्रार दाखल


अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध क्षमण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत. कंगना ट्विटरवर जोरदार निशाणा साधत आहे. कंगना काल मुंबईत दाखल झाली. मात्र त्याआधी मुंबई महानगरपालिकेने तिच्या अनाधिकृत ऑफिसवर हातोडा चालवला. यामुळे भडकलेल्या कंगनाने पातळी सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता.

आता मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या कंगनाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. वकील नितीन माने नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असून, कंगनाला न्यायालयात खेचणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या प्रकरणाशी काहीही देणेघेणे नाही, असे असले तरी कंगनाने त्यांचे नाव घेतले. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत असे शब्द वापरणे योग्य नाही.

कंगनाने तिच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला होता. कंगना व्हिडीओत म्हणाली की, आज माझे घर तोडले, उद्या तुझे गर्वहरण होईल, अशी भाषा वापरली होती.