सलाम! या कोरोना योद्ध्याने आतापर्यंत तब्बल 9 वेळा केले प्लाझ्मा दान


भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज 90 हजाराने वाढत आहे. एकूण आकडा 45 लाखांच्या जवळ पोहचला असला तरीही लोक योग्य त्या नियमांची अंमलबजावणी करताना दिसत नाही. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जाते. मात्र काहीलोक शंका, भितीमुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र दिल्लीतील एका कोरोना योद्ध्याने आतापर्यंत 9 वेळा प्लाझ्मा दान केले असून, पुढेही दान करणार असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीच्या जहांगीर पूर येथे राहणारे तरबेज खान यांनी कोरोनावर मात केली आहे. आता ते दुसऱ्यांचे प्राण वाचवत आहेत. मार्चमध्ये ते सौदी अरेबियावरून परतलेल्या आपल्या बहिणीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तरबेज म्हणाले की, जेव्हा मला कोरोनाची लागण झाली, त्यावेळी समाज मला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत होता. लोक असे करत होते, जणू मी काही बॉम्ब आहे, जो फुटेल. प्रत्येकजण माझ्या कुटुंबापासून दूर राहत होते.

हॉस्पिटलमधून बरे होऊन परतल्यानंतर देखील सोसायटीतील लोक त्यांच्याशी व्यवस्थित वागत नव्हते. तरबेज सांगतात ही अशी दुर्भाग्यपुर्ण घटना आहे, जे ते कधीच विसरणार नाहीत. यानंतर त्यांनी दुसऱ्यांची मदत करण्याचे ठरवले व आतापर्यंत 9 वेळा आपला प्लाझ्मा दान केला आहे.

त्यांच्या पत्नी कुसुम यांनी सांगितले की, त्यांनी प्लाझ्मा दान करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वांनी भेदभाव करणे बंद केले. डॉक्टरांनी आम्हाला प्लाझ्मा दान करणे चांगले असल्याचे सांगितले. हे प्राण वाचवते, त्यामुळे दान नक्की करायला हवे. आता केवळ संस्थाच नाही तर कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील सदस्यांचा देखील तरबेज यांना फोन येतो व ते आनंदाने मदत करतात.