ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाद्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल रोखण्यात आले आहे. एका स्वयंसेवकामध्ये अनपेक्षित आजार दिसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डीसीजीआयने नोटीसमध्ये म्हटले आहे की, जोपर्यंत रुग्णाच्या सुरक्षेची खात्री पटत नाही, तोपर्यंत तुम्हाला देण्यात आलेली क्लिनिकल ट्रायलची परवानगी का रोखण्यात येऊ नये?
ऑक्सफोर्ड लसीचे ट्रायल रोखल्यानंतर सिरम इंस्टिट्यूटला मिळाली नोटीस
अमेरिका, ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत या लसीचे ट्रायल रोखण्यात आले आहे. मात्र सीरम इंस्टिट्यूटने याबाबतची माहिती सेंट्रल लायसेंसिंग अथॉरिटी दिली नाही व त्या घटनेचा अहवाल देखील सोपवला नसल्याने डीसीजीआय नाराज आहे.
ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू असताना एक स्वयंसेवकाची प्रकृती अचानक बिघडली आहे. डीसीजीआयने पत्रात म्हटले आहे की, या नोटीसचे त्वरित उत्तर द्यावे. अन्यथा तुमच्याकडे काहीही स्पष्टीकरण नाही असे मानले जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल.
सीरम इंस्टिट्यूटने म्हटले होते की, ब्रिटनमध्ये ट्रायल रोखण्यात आले असले तरी त्याचे अवलोकन केल जात आहे. भारतातील ट्रायल सध्या सुरू आहे. तसेच आम्ही डीसीजीआयच्या नियमावलीचे पालन करत असल्याचे देखील इंस्टिट्यूटने म्हटले आहे.