राममंदिर ट्रस्टच्या खात्यातून उडवले लाखो रुपये, बनावट चेकद्वारे कारनामा


अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या राम जन्मभूमी ट्रस्टच्या एका बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने 6 लाख रुपये काढून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच निधीतून ट्रस्ट मंदिराची निर्मिती करत आहे. राम मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी असलेल्या राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी याबाबत पोलीसात एफआयआर नोंदवली आहे. त्यांचा आरोप आहे की ट्रस्टच्या एका बँक खात्यातून बनावट चेकचा वापर करून 6 लाख रुपये काढण्यात आले आहेत.

चंपत राय यांनी एफआयआरमध्ये माहिती दिली की, बँकेकडून फोन आल्यानंतर या फसवणुकीची माहिती समजली. चेकवर देखील ट्रस्टीची बनावट स्वाक्षरी असण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत.

मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय देत ट्रस्टची स्थापना करण्यास सांगितले होते. यानंतर राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टची स्थापना करत याची मंदिरा निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली. 5 ऑगस्टला मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी देशभरातून निधी जमा केला जात आहे.