सिमला येथील प्रियांका गांधीचा बंगला पाडण्याची मागणी

हिमाचल प्रदेशाची रहिवासी कंगना राणावत चे मुंबई येथील ऑफिस मुंबई महापालिकेने पाडल्यानंतर कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचा सिमला येथे बांधलेला बंगला पाडावा अशी मागणी होऊ लागली आहे. सोशल मीडियावर कंगना, महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरे ट्रेंड होट असताना मध्येच ही मागणी करण्यात आली आहे. बुधवारी बीएमसीने कंगनाचे कार्यालय अवैध बांधकाम केल्याचे कारण देऊन पाडले त्यात तिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोशल मीडियावर त्यानंतर प्रियांका गांधी यांचा सिमला येथे बांधला गेलेला अवाढव्य बंगला पूर्ण अवैध असल्याचे आरोप केले जात आहेत आणि तो पाडून टाकावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सिमला हिमाचलची राजधानी आहे. प्रियांका यांना बंगल्यासाठी जमीन कशी मिळाली आणि कुणी दिली याचा खुलासा मागितला जात आहे. प्रियांका यांचा बंगला ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी कॉंग्रेस नेते केहरसिंग खाची यांच्याकडे आहे. लँड रीफॉर्म अॅक्ट सेक्शन ११८ मधील नियमांचा भंग त्यासाठी केला गेल्याचे सांगितले जात आहे.

नियमानुसार हिमाचल राज्याच्या बाहेर राहणाऱ्यांना हिमाचल मध्ये जमीन खरेदी करता येत नाही. सिमला येथे प्रियांका गांधी यांनी चार बिघे जमिनीवर दोन मजली बंगल्याचे बांधकाम २००८ मध्ये सुरु केले होते. दोन मजले बांधून पूर्ण झाल्यावर डिझाईन आवडले नाही म्हणून बांधकाम पाडून नव्याने पूर्ण बांधकाम करण्यात आले आहे.