आयपीएल तयारीसाठी सौरव गांगुली दुबईत दाखल

युएई मध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होत असलेल्या आयपीएल २०२० स्पर्धांच्या तयारीचा अंदाज घेण्यासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली दुबईला रवाना झाला. या संदर्भात सौरवने स्वतःच इन्स्टाग्रामवर माहिती दिली असून सहा महिन्यानंतर प्रथमच फ्लाईट घेतल्याचे नमूद केले आहे. सौरवने मास्क आणि फेसशिल्ड घातलेला त्याचा फोटो शेअर केला असून कॅप्शन मध्ये तो लिहितो, ‘ सहा महिन्यानंतर पहिली फ्लाईट. आयपीएल तयारीसाठी दुबईला चाललोय. करोनामुळे जीवनात नाट्यमय बदल झाला आहे.’

यंदाची आयपीएल युएई मध्ये सुरक्षित वातावरणात खेळविली जात असून आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यापूर्वीच त्यांच्या सहकाऱ्यांसह दुबईला रवाना झाले आहेत. आयपीएलचा सलामी सामना मुंबई आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये होणार आहे. या मालिकेत ६० सामने होणार आहेत आणि ते दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे होणार आहेत.

प्रत्येक पाच दिवसांनंतर खेळाडूंची आणि स्टाफची करोना टेस्ट केली जाणार आहे. आयपीएल मध्ये यंदा प्रथमच अनलिमिटेड सबस्टीट्यूट खेळाडूंना परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे समजा टीम मधल्या खेळाडूला करोना झाला तर त्याच्या बदली राखीव खेळाडू खेळू शकणार आहे.