रशियाने करोना लसीला म्हणून दिले ‘स्पुतनिक ५’ नाव

रशियाने देशात बनलेल्या कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीला सर्वप्रथम मंजुरी देऊन जगातील पहिली लस बनल्याचा दावा केला आहे. रशियाच्या गामलेया संशोधन संस्थेने बनविलेल्या या लसीचे नामकरण रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी ‘ स्पुतनिक ५’ असे केले आहे. जीवघेण्या कोविड १९ वर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कसून प्रयत्न करत आहेत आणि अनेक देशांनी त्यांनी बनविलेली करोना लस अंतिम चाचणीच्या टप्प्यावर असल्याने जाहीर केले आहे. मात्र सर्वमान्य करोना लस अजून तयार झालेली नाही.

पुतीन यांनी या लसीचे नामकरण स्पुतनिक ५ करण्यामागचे रहस्य काय या विषयी काही मते व्यक्त केली जात आहेत. १९५७ मध्ये रशियाने अंतराळात पाहिला उपग्रह लाँच केला त्याचे नाव स्पुतनिक असेच होते. त्यावेळी अमेरिका आणि रशिया यांच्यात पहिला उपग्रह अंतराळात कोण पाठविणार यावरून मोठी चुरस होती आणि त्यात रशिया विजयी झाली होती. करोना लस बनविण्यात सुद्धा रशिया आणि अमेरिका याच्यात अशीच चुरस होती आणि तीही रशियाने जिंकली आहे हे सिद्ध करण्यासाठी या लसीचे नामकरण स्पुतनिक पाच असे केल्याचे समजते. त्यामागे अमेरिकेला खिजविणे हाच हेतू असल्याचे मानले जात आहे.

रशिया ऑक्टोबर पासून करोना लसीकरण कार्यक्रम राबविणार आहे. मात्र वैद्यकीय तज्ञ या लसीबाबत साशंक आहेत. रशियाने ही लस बनविताना त्यातील काही महत्वाच्या पायऱ्या गाळल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही लस किती सुरक्षित आणि प्रभावी असेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पुतीन यांनी मात्र सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊनच ही लस तयार केल्याचा दावा केला आहे.