बीआरओ ने रेकॉर्ड वेळात दुरुस्त केला भारत चीन सीमेवरील पूल

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर तणाव गंभीर होऊ लागला असताना सेना आणि निमलष्करी दलांच्या जोडीने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन झटून काम करत असल्याचे दिसून आले आहे. भारताच्या सीमा जेथे जेथे चीनशी जुळलेल्या आहेत त्या सर्व सीमांवर लष्कराची कडेकोट देखरेख असून सैन्य हालचाली करण्याची वेळ आलीच तर त्यासाठी रस्ते, पूल यांच्या दुरुस्त्या युद्ध पातळीवर केल्या जात आहेत.

उत्तराखंडच्या पीथोरागढ जिल्यातील १ महत्वाचा पूल बीआरओने विक्रमी वेळात दुरुस्त केला आहे. जीमिघाट येथील हा बेलीब्रीज १८ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे क्षतिग्रस्त झाला होता. रणनीतीच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा आहे. मूनस्सारी व मिलाम या दोन गावांना हा पूल जोडतो. मिलाम हे भारत चीन सीमेवरचे भारताच्या हद्दीतील शेवटचे गाव आहे.

सर्वसाधारणपणे पहाडी भागात असलेले असे बेलीब्रीज मोडले तर ते पुन्हा दुरुस्त करून वापरात आणण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. मात्र बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने हा पूल केवळ सात दिवसात दुरुस्त करून पुन्हा कार्यरत केला आहे. जूनमध्ये याच रस्त्यावर जड बुलडोझर गेल्याने याच प्रकारचा एक पूल तुटला होता तोही बीआरओने पाच दिवसात दुरुस्त करून रेकॉर्ड केले होते.