नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना करण्यात आले नामांकित


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 2021 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. इस्त्रायल आणि यूएईमधील ऐतिहासिक शांतता वार्तासाठी मध्यस्थी करण्यात ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांना नामांकित करण्यात आले आहे. नॉर्वे संसदेचे ख्रिश्चियन ताइब्रिंग यांच्याद्वारे ट्रम्प यांना या पुरस्कारासाठी नामांकित केले गेले आहे.

ख्रिश्चियन यांनी ट्रम्प यांचे कौतुक करत दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात शांतता स्थापित करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. ट्रम्प यांनी दोन देशांमध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले शत्रूत्व संपवले आहे. जे कोणत्याही प्रकारे शांतता पुरस्कारासाठी पुरेसे आहे.

ख्रिश्चियन ताइब्रिंग हे नॉर्वेच्या संसदेत 4 वेळा निवडून आलेले आहेत. ते नाटोच्या संसदीय असेंबलीचे देखील सदस्य आहेत. एवढेच नाही तर त्यांनी दावा केला की, ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील जम्मू-काश्मीर वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दक्षिण कोरिया- उत्तर कोरियामधील शत्रूत्व समाप्त केले आहे आणि उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम केले आहे.

दरम्यान, याच वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होणार आहे. त्यामुळे हे नामांकन ट्रम्प यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना देखील शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.