‘वचन कोरोना संपवण्याचे दिले होते, मात्र कोट्यावधी रोजगार संपवले’, राहुल गांधींची सरकारवर टीका


देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत लॉकडाऊन देशातील असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंड सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवरून निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, अचानक करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन 21 दिवसात कोरोना संपविण्याचे होते, मात्र कोट्यावधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवले. मोदीजी जनविरोधी डिजास्टर प्लान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

राहुल गांधी व्हिडीओत म्हणाले की, कोरोनाच्या नावावर जे केले ते असंघटित क्षेत्रावर तिसरे आक्रमण होते. कारण गरीब लोक रोज कमवतात, रोज खातात. लघू व मध्यम वर्गातील व्यापारासोबत देखील असेच झाले. कोणतीही सुचना न देता लॉकडाऊन करत यांच्यावर आक्रमण केले. पंतप्रधान म्हणाले होते 21 दिवसांची लढाई असेल, असंघटित क्षेत्राचा मणका 21 दिवसात तुटला.

व्हिडीओमध्ये आपल्या न्याय योजनेबाबत ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर सरकारला अनेकदा गरीबांची मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले. न्याय योजनेसारखी एखादी योजना लागू करावी लागेल. बँक खात्यात थेट पैसे जमा करावे लागतील. मात्र तसे केले नाही. लॉकडाऊन हे कोरोनावर आक्रमण नव्हते, हिंदुस्तानमधील गरीबांवर आक्रमण होते. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होते. लॉकडाऊन मजूर शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होते, अशी टीका राहुल गांधींनी केली.