कोरोना : 2 लाख रुग्ण संख्या ओलांडणारा पुणे ठरला पहिला जिल्हा


मागील काही दिवसांपासून देशात दररोज 90 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. विशेष पुणे जिल्हा हा कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट म्हणून समोर आला असून, 2 लाख कोरोनाबाधितांचा आकडा ओलांडणारा पुणे हा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. पुण्यातील मागील काही दिवसांपासून दररोज 4 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.

अधिकाऱ्यांनुसार कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणात वाढवल्याने जिल्ह्यात अधिक कोरोग्रस्त आढळत आहेत. पुण्याने 5 ऑगस्टला कोरोना रुग्णांचा 1 लाखांचा आकडा पार केला होता. महिन्याभरातच हा आकडा दुप्पट झाला आहे. पुण्याच्या तुलनेत सोमवारपर्यंत दिल्लीत 1,93,526 आणि मुंबईत 1,57,410 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की, सध्या कोरोना रुग्णांच्या बाबतीत पुणे देशात सर्वात पुढे आहे. याचे कारण जिल्हा प्रशासनाने वाढवलेल्या टेस्टिंग आहेत. पुण्यात दर 10 लाख लोकसंख्येमागे 74 हजारांपेक्षा अधिक टेस्टिंगचा त्यांनी दावा केला आहे. याशिवाय अभियान चालवून लोकांना कोरोना चाचणी करण्यासाठी जागरूक केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.