कंगनाला दिलासा, उच्च न्यायालयाने ऑफिसवरील कारवाईला दिली स्थगिती


मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. कंगना आज मुंबईला येणार आहे. मात्र त्याआधी मुंबई महानगरपालिकेने तिच्या जुहू येथील ऑफिसवर कारवाई करण्यास सुरूवात केली. बीएमसीने ऑफिसवर बुलडोझर चालवले. बीएमसीच्या या कारवाईनंतर कंगनाच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती.

कंगनाच्या याचिकेनंतर न्यायालयाने तिला दिलासा दिला असून, कारवाईला स्थगित करण्यास सांगितले आहे. सोबतच कंगनाच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. उद्या 3 वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

कंगनाने देखील बीएमसीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या डिमॉलिशनवर बंदी घातलेली आहे. असे असले तरी ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.

बीएमसीने कारवाई केल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली आहे. सोबतच मुंबई पोलीस आणि सरकारवर निशाणा साधत ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ अशी नाव न घेता टीका केली आहे.

दरम्यान, काल बीएमसीने कंगनाच्या बंगल्याबाहेर एक नोटीस चिटकवली होती. यानुसार कोणतीही परवानगी न घेता कंगनाने अनेक बदल केले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील अध्ययन सुमनच्या दाव्यावरून कंगनाचा ड्रग्स प्रकरणात तपास करणार असल्याचे म्हटले आहे.