‘आज माझे घर तोडले, उद्या तुझे गर्वहरण होईल’, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख


अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. त्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेने अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगत तिच्या ऑफिसवर कारवाई केली. यामुळे भडकलेल्या कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत खुले आव्हान दिले आहे. आज माझे घर तोडले, उद्या तुझे गर्वहरण होईल, असे म्हणत कंगनाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

बीएमसीच्या कारवाईनंतर कंगनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. कंगना म्हणाली की, उद्धव ठाकरे तुला काय वाटते ? तू फिल्म माफियांसोबत मिळून माझे घर तोडल्याने खूप मोठा बदला घेतला आहे. आज माझे घर तोडले आहे. उद्या तुझे गर्वहरण होईल. हे फक्त वेळेचे चक्र आहे. लक्षात ठेव, नेहमीच एकसारखे राहत नाही.

कंगना पुढे म्हणाली की, मला वाटते माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. कारण, मला माहिती होते काश्मिरी पडितांना काय वाटले असेल. आज मी ते अनुभवले आहे. आज मी या देशाला वचन देते की केवळ अयोध्याच नाही तर काश्मीरवर देखील एक चित्रपट काढणार आहे व देशवासियांना जागरूक करणार आहे. ती म्हणाली की, मला माहिती होते की हे होणार आहे तर होणारच. मात्र हे माझ्या सोबत झाले आहे, याला काहीतरी अर्थ आहे. उद्धव ठाकरे ही क्रूरता आणि दहशत आहे… बरे झाले माझ्यासोबत झाले. कारण याचा काहीतरी अर्थ आहे.

दरम्यान, कंगना विमानतळावर पोहचल्यानंतर शिवसेनेकडून तिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व काळे झंडे दाखवण्यात आले.