लॉकडाऊन ढील मिळाल्यावर तिरुपती बालाजी मंदिरात गर्दी

आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिर पुन्हा भाविकांच्या गर्दीने गजबजू लागले असून दररोज किमान १५ हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचे तिरुपती ट्रस्ट कडून सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन हटविल्यावर रविवारी प्रथमच एक दिवसात मंदिराच्या दानपेटी मध्ये १ कोटी रुपये दान जमा झाल्याचे समजते. २८ ऑगस्ट पासून दान आणि दर्शन प्रमाण वाढल्याचे दिसत असले तरी ही रक्कम करोनापूर्व काळापेक्षा कमीच आहे असेही सांगितले जात आहे.

अडचणीच्या काळात सुद्धा भाविकांचा देवस्थानवरील विश्वास कमी झालेला नाही या बद्दल तिरुपती तिरुमला ट्रस्टने समाधान व्यक्त केले आहे. थोड्याच दिवसात परिस्थिती पूर्व पदावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. २० मार्च पासून बालाजी मंदिर भाविकांसाठी पूर्ण बंद केले गेले होते. त्यानंतर ८० दिवसांनी पुन्हा मर्यादित भाविक येण्यास परवानगी दिली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार १ मार्च ते १० मार्च या काळात दररोज ५० ते ६० हजार भाविक मंदिरात येत होते आणि दररोज ३ कोटींचे दान दानपेटीत जमा होत होते. मंदिर उघडल्यावर ट्रस्ट मधील काही कर्मचारी करोना संक्रमित झाले आणि जून मध्ये ही संख्या ८० वर होती ती ऑगस्ट मध्ये ७५० संक्रमितांवर पोहोचली होती. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचा सुद्धा करोनाने बळी घेतला आहे. ट्रस्ट मध्ये एकूण २१ हजार कर्मचारी कार्यरत असून ६० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे.