मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या नेत्याने घेतली खासदारकीची शपथ

फोटो सौजन्य दैनिक भास्कर

श्रीलंकेत हत्येच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा झालेले नेते प्रेमलाल जयशेखरा यांनी मंगळवारी संसदेत येऊन खासदारकीची शपथ घेतली. ४५ वर्षीय जयशेखरा श्रीलंकेच्या सत्तारूढ श्रीलंका पोदुजन पार्टीचे नेते आहेत. मृत्यूदंड शिक्षा सुनावल्यावरही खासदारकीची शपथ घेणारे ते पाहिले नेते बनले आहेत.

२०१५ मध्ये निवडणूक प्रचार सभेत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला जयशेखरा यांनी गोळी घालून ठार केले होते. त्यांना खुनाच्या आरोपावरून जुलै २०२० रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. पण न्यायालयाचा निर्णय येण्याअगोदरच जयशेखरा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी दिली गेली होती. त्यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढविली आणि जिंकली. २० ऑगस्ट रोजी संसदेचे अधिवेशन सुरु झाले पण त्यात सहभागाची परवानगी तुरुंग प्रशासनाने जयशेखरा याना दिली नाही. त्यावर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना कडक बंदोबस्तात मंगळवारी संसदेत नेले गेले तेथे त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्यात आले. जयशेखरा याना शपथ घेऊ दिल्याचा निषेध करण्यासाठी विरोधी खासदार काळे स्कार्फ घालून संसदेत आले होते त्यांनी नंतर सभा त्याग केला.

जयशेखरा २००१ पासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यापूर्वी शिवा नेस्तुराई चंद्र्कांतन या खासदारावर हत्येचा आरोप झाला होता त्यानीही खासदारकीची शपथ घेतली होती. मात्र मृत्युदंडाची शिक्षा झाल्यावर खासदारकीची शपथ घेणारे जयशंकरा हे पहिलेच नेते आहेत. श्रीलंकेत मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे पण १९७६ नंतर आजपर्यंत कुणालाच फाशी दिले गेलेले नाही.