फोर्ब्स धनकुबेर यादीत यंदा ७ भारतवंशीय, ट्रम्प ३३९ व्या क्रमांकावर

फोर्ब्स तर्फे अमेरिकन धनकुबेरांच्या जाहीर केलेल्या नव्या यादीत सलग तिसऱ्या वर्षी अमेझॉनचे जेफ बेजोस प्रथम क्रमांकावर असले तरी यंदा प्रथमच या यादीत भारतीय वंशाचे ७ अतिश्रीमंत सामील झाले आहेत. या यादीत ४०० जणाचा समावेश असून दोन नंबरवर बिल गेट्स आहेत. करोना महामारीच्या काळात अमेरिकन धनकुबेरांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचेही दिसून आले असून या ४०० लोकांची एकूण संपत्ती ३२ खरब डॉलर्सवर गेली आहे. ती मागच्या यादीच्या तुलनेत २४० अब्ज डॉलर्सनी अधिक आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प ३३९ व्या स्थानावर आहेत.

या यादीत पहिल्या स्थानावर असलेले जेफ बेजोस यांची संपत्ती १७९ अब्ज डॉलर्स असून बिल गेटस यांची संपत्ती १११ अब्ज डॉलर्स आहे. या यादीत समावेश झालेल्या ७ भारतीय वंशाच्या श्रीमंतात सायबर सिक्युरिटी फर्म जेडस्कॅलरचे सीएफओ जे. चौधरी, सिम्फनी टेक्नोलॉजीचे संस्थापक रोमेश बाधवानी, ऑनलाईन कंपनी वेफेअरचे सहसंस्थापक नीरज शहा, सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेन्चर्सचे विनोद खोसला, शेर्पली व्हेन्चर्सचे भागीदार कवितार्क रामश्रीराम, एअरलाईन व्हेटरन राकेश गंगाल आणि वर्क डे चे सीईओ अनिल भूसरी यांचा समावेश आहे.

या यादीत फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची संपत्ती ८५ अब्ज डॉलर्स आहे. वॉरन बफे चार क्रमांकावर आहेत आणि त्यांची संपत्ती आहे ७३.५ अब्ज डॉलर्स.