जगातील एकमेव आत्मनिर्भर गणराज्य नाखचिवन

करोनाचा विळखा हळू हळू ढिला पडू लागल्यामुळे अनेकांना पर्यटनाचे वेध लागले आहेत. पर्यटकांना फारसे परिचित नसलेले आणि जगातील एकमेव आत्मनिर्भर स्थळ या दृष्टीने आदर्श ठरू शकेल. या गणराज्याचे नाव आहे नाखचिवन रिपब्लिकन. अझरबैजान जवळचे हे स्वायत्त गणराज्य म्हणजे एक मोठे लँडलॉक स्थळ म्हणता येईल कारण आर्मेनिया, इराण आणि तुर्कस्थानच्या सीमेमध्ये हे गणराज्य जणू बंदिस्त आहे. निसर्गसौंदर्याची खाण असलेले नाखचिवन वास्तूकलेचा अप्रतिम खजिना म्हणून सुद्धा ओळखले जाते.

या गणराज्याची लोकसंख्या साडेचार लाख आहे आणि सोविएत संघाचे विघटन होण्यापूर्वीच या गणराज्याने स्वायत्ततेची घोषणा केली होती. अझरबैजनची राजधानी बाखू पासून या गणराज्याची राजधानी नाखचिवन विमानाने ३० मिनिटांच्या अंतरावर आहे.

येथील नागरिकांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा प्राचीन काळी जगप्रलय झाला आणि पृथ्वी बुडाली तेव्हा नावेतून आलेला नोहा या जागीच एका पहाडावर उतरला होता आणि येथील नागरिक स्वतःला त्याचे वंशज मानतात. या देशाची जमीन हे हजरत नूहची जमीन असल्याचा त्याच्या दावा आहे. नाखचिवन हा अर्मेनियन भाषेतील दोन शब्दांपासून बनलेला शब्द असून त्यांचा अर्थ वंशजांची जागा असा आहे.

हे छोटेसे गणराज्य कमालीचे स्वच्छ आहे. आठवड्यातून एक दिवस सर्व सरकारी कर्मचारी स्वेच्छेने येथे स्वच्छता करतात. रस्त्यातून कागदाचा बारीक कपटा सुद्धा कधी दिसत नाही. या देशात अनेक इतिहासिक स्थळे, इमारती आहेत, संग्रहालये आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे सोविएत विघटनानंतर आलेल्या अनेक बंधनामुळे येथील जनता स्वयंपूर्ण झाली असून अन्न आणि गरजेच्या वस्तू देशातच बनविल्या जातात. येथील शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने केली जाते. देशाच्या नदीत सापडणारे मासेच येथे खाल्ले जातात. हे गणराज्य आर्थिक बाबतील सुद्धा आत्मनिर्भर असून त्यांचा कोणाशीही आंतरराष्ट्रीय व्यापार नाही. अर्थात हा त्यांना त्यांचा राष्ट्रीय गौरव वाटतो.

या देशात पर्यटनाची सुरवात संथ गतीने होते आहे. सध्या येथे श्वसन रोगांवर उपचार घेण्यासाठी पर्यटक येऊ लागले आहेत. डूझडँग पर्वतात असलेले औषधी मीठ सर्व प्रकारचे श्वसन रोग बरे करते असे सांगितले जाते. या डोंगरावर गुहेत राहून रुग्णावर उपचार केले जातात. येथे २ हजार वर्षापूर्वीचा किल्ला असून नोहचे मंदिर मात्र नष्ट झाले आहे मात्र त्याचा पाया अजून जतन केला गेला आहे. येथे अनेक प्रकारच्या जडीबुडी सापडतात आणि नागरिक दुखण्यात याच जडीबुटिंचा वापर करून रोगमुक्त होतात असेही सांगितले जाते.