जगाने पुढील महामारीसाठी तयार राहावे, डब्ल्यूएचओचा इशारा


जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार पाहण्यास मिळत आहे. भारतात दररोज 90 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दुसऱ्या महामारीसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घ्रेबेसिस म्हणाले की, जगभरातील देशांनी दुसऱ्या महामारीसाठी तयार राहायला हवे. देशांनी यासाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला हवी. अन्यथा कोरोनासारखी स्थिती निर्माण होईल.

डॉ. टेड्रोस म्हणाले की, नोवेल कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 8 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काही देशांमधील भयानक स्थिती वाढत चालली आहे. यावर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. ही काही शेवटची महामारी नाही. इतिहासात याआधी अनेक महामारी आलेल्या आहेत. या महामारी जीवनाचे सत्य आहेत. हे संपत नाही. मात्र दुसरी महामारी जगाला नष्ट करण्याआधी आपण त्यासाठी पुर्णपणे तयार राहायला हवे.

ते म्हणाले की, जगभरातील देशांनी संभावित आजारांवरील लस आणि औषध एकत्र येऊन शोधले पाहिजेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली पाहिजे. लस आणि औषधे त्वरित बाजारात आणण्याची व्यवस्था करायला हवी. जेणेकरून महामारी पसरल्यास त्वरित त्यावर नियंत्रण मिळवता येईल.