ज्येष्ठ रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन


भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ गोविद स्वरूप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उत्तराखंड येथील ठाकूरद्वार येथे दि. २३ मार्च १९२९ रोजी जन्मलेल्या डॉ. स्वरूप यांनी अलाहाबाद विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यानंतर ते दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेत काम केले. याचवेळी त्यांना रेडिओ खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथे जाण्याची संधी मिळाली. स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडी प्राप्त करून परत आलेल्या डॉ. स्वरूप यांनी भारतात रेडिओ खगोलशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली. टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये त्यांनी या ज्ञानशाखेचा स्वतंत्र विभाग सुरू केला.

मुंबईजवळच्या कल्याण येथे प्रायोगिक तत्वावर देशातील प[पाहिली रेडिओ दुर्बीण त्यांनी उभारली. त्यानंतर उटी येथे भारताच्या पहिल्या रेडिओ दुर्बिणीची उभारणी केली. पुण्याजवळ खोडद येथे त्यांनी महाकाय रेडिओ दुर्बीण उभारली. ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र स्थापन केले. विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना पद्मश्री, ब्रिटनचा ग्रेट रेबर यासह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.