४५ वर्षानंतर भारत-चीन सीमेवर घुमले गोळ्यांचे आवाज 

गेले काही दिवस चीनने लडाखच्या काही भागात घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरु असताना ४५ वर्षानंतर प्रथमच भारत चीन सीमेवर सैनिकांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लडाख मधील पेंगोंग सरोवर दक्षिण किनाऱ्यावरील भागात भारतीय सेनेच्या जवानांनी चीनी सैनिकांवर गोळीबार केल्याचा दावा चीनी सेनेच्या पश्चिम थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय सेनेच्या जवानांनी ७ सप्टेंबर रोजी एलएसी पार करून चीनी हद्दीत घुसखोरी केली आणि फायरिंग केले. शेंपौ भागात ही घटना घडली असल्याचा दावा करताना हा प्रवक्ता म्हणाला, चीनी सैनिक पेट्रोलिंग करत असताना आत घुसलेल्या भारतीय सैनिकांकडे विचारणा करण्यासाठी पुढे आले तेव्हा भारतीय सेनेने वॉर्निंग शॉट म्हणजे हवेत गोळीबार केला.

भारतीय सेनेकडून या संदर्भात कोणताही खुलासा केला गेलेला नाही. यापूर्वी ४५ वर्षांपूर्वी २० ऑक्टोबर १९७५ मध्ये अरुणाचलच्या तुलुंग ला मध्ये चीनने आसाम रायफल गस्ती सैनिकांवर हल्ला चढविला होता त्यात चार जवान शहीद झाले होते. या वर्षी जून मध्ये गलवान खोऱ्यात भारत चीन सेना आमनेसामने येऊन झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी भारतीय हद्दीत घुसत असलेल्या चीनी सैनिकांना भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर देऊन पिटाळून लावले होते आणि ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉपवर ठाणे उभे केले होते.