गलवान घटनेनंतर प्रथमच फ्रांस संरक्षण मंत्री भारत भेटीवर

फ्रांसच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली १० सप्टेंबर रोजी भारत भेटीवर येत असून राफेल विमाने हवाई दलात सामील करण्यासाठी केल्या जात असलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या भारतात येत आहेत.  अंबाला येथील हवाई दलाच्या बेसवर हा कार्यक्रम होणार आहे. पार्ली, संरक्षण मंत्री राजनाथसिंग आणि राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांचीही भेट घेणार आहेत.

भारत चीन सीमेवर तणाव वाढल्यानंतर आणि गलवान येथे चीनी सैनिकांबरोबर उडालेल्या चकमकीनंतर प्रथमच परदेशी संरक्षण मंत्री भारत भेटीवर येत आहेत.  तसेच फ्रांसमध्ये करोना उद्रेकानंतर परदेशात जाणाऱ्या पार्ली या पहिल्याच मंत्री ठरल्या आहेत. गलवान घटनेनंतर पार्ली यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंग याना पत्र लिहून दुःख व्यक्त केले होते.

जुलै मध्ये पहिली पाच राफेल विमाने आपल्या ताफ्यात दाखल करून भारतीय हवाई दलाने त्यांची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत केली असून डिसेंबर २०२१ मध्ये या ताफ्यातील शेवटचे राफेल भारताला मिळेल असे समजते. भारताने फ्रांस कडून ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी ५८ हजार कोटीचा करार केला होता. २९ जुलै रोजी पहिली पाच विमाने भारतात दाखल झाली. या ३६ विमानांपैकी ३० फायटर जेट विमाने आहेत आणि ६ प्रशिक्षण विमाने आहेत.