कंगनाला १४ दिवस क्वारंटाईन करण्यास बीएमसी सरसावली

कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यामध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या वादात आता मुंबई महापालिका म्हणजे बीएमसीने ही उडी घेतली आहे. कंगनाने ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत असून हिम्मत असेल तर रोखून दाखवा असे तगडे आव्हान दिल्यानंतर शिवसेना महिला आघाडी आणि काही नेत्यांनी कंगनाला पाहून घेऊ असे प्रत्युत्तर दिले होतेच पण आता बीएमसीने उद्या कंगना विमानतळावर उतरताच तिला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याची तयारी सुरु केली आहे.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांकडून सुरक्षा होणार नाही अशी भीती कंगनाने व्यक्त केल्यावर तिला केंद्रीय गृह मंत्रालयाने वाय दर्जाची सुरक्षा दिली असून त्यामुळे कंगनाचे मुंबईतील आगमन हा औसुक्त्याचा विषय बनला आहे. बीएमसीने असा खुलासा केला आहे की कंगना ७ दिवसांपेक्षा अधिक काळ मुंबईत राहणार असेल तर नियमाप्रमाणे तिला क्वारंटाइन केले जाईल. पण तिने सात दिवसाचे रिटर्न तिकीट दाखविले तर मात्र तिला क्वारंटाइन केले जाणार नाही.

दरम्यान सोमवारी बीएमसीने कंगनाच्या मुंबई ऑफिसवर छापा घातल्याचा व्हिडीओ कंगनाने शेअर केला आहे. ती म्हणते हे ऑफिस व्हावे म्हणून मी १५ वर्षे मेहनत घेतली आणि आता माझे स्वप्न तुटण्याची वेळ आली आहे. जेव्हा मी चित्रपट निर्माती होईन तेव्हा स्वतःचे ऑफिस असावे म्हणून मी हे ऑफिस बांधले त्यासाठी बीएमसीची पूर्वपरवानगी घेतली असून परवानगीची कागदपत्रे माझ्याजवळ आहेत.