सुरक्षित ‘५ जी’ नेटवर्कसाठी भारत, इस्राएल आणि अमेरिकेचे सहकार्य


सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह ‘५ जी’ नेटवर्कच्या उभारणीबरोबरच आगामी काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत, इस्राएल आणि अमेरिका परस्पर सहकार्याने संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती अमेरिकेच्या तंत्रज्ञान विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

विशेषतः इस्राएल आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांच्या पुढाकाराने या तिन्ही देशातील नागरिकांच्या पुढाकाराने परस्पर सहकार्यातून तंत्रज्ञानाच्या विकास आणि देवाण-घेवाणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘५ जी’ नेटवर्कची उभारणी हा या प्रयत्नांचा एक भाग असणार आहे.

‘५ जी’ नेटवरची उभारणी हे केवळ हिमनगाचे टोक आहे. हा टप्पा पार केल्यानंतर नव्या पिढीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकास, संशोधनाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या उपसंघटक बोनी ग्लिक यांनी सांगितले. या प्रयत्नातून मोबाईल फोनसारख्या छोट्या उपकरणातही आपण कल्पनाही करू शात नाही, असे तंत्रज्ञ उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठी या प्रयत्नांना अधिकृत आणि संघटीत स्वरूप देण्याची आवश्यकता असून आम्ही त्या दृष्टीने पावले उचलत आहोत, असेही त्या म्हणाल्या.