मुंबईत कंगनाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची: करणी सेना


मुंबईत अभिनेत्री कंगना राणावतच्या संरक्षणाची जबाबदारी करणी सेना घेत असल्याची ग्वाही संघटनेचे जीवन सोलंकी यांनी दिली आहे. कंगना मुंबईच्या विमानतळावर आल्यापासून तिच्या घरी पोहोचेपर्यंत करणी सेनेचे पथक तिच्या संरक्षणासाठी तिच्याबरोबर असेल आणि त्यानंतरही शहरात आम्ही तिला संरक्षण देऊ, असे त्यांनी संगितले.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर टीका केली आहे. मुंबईचा अवमान करणाऱ्या अभिनेत्रीला मुंबईत राहू देणार नाही, अशी धमकीही शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाला केंद्रीय गृहविभागाने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली असून त्यावरूनही वाद झडत आहेत.

कंगना आणि शिवसेनेतील वादाच्या पार्श्वभूमीवर करणी सेनेने तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनेही कंगनाला सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. दरम्यान, मुंबईचा अवमान करणारे विधान केल्याबद्दल कंगनाच्या विरोधात अंधेरी आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.