भारतातील जावयांची गावे

मेरा भारत महान अशी घोषणा आपण देतो त्यामागे अनेक कारणे आहेत. भारतातील विविध जाती, जमाती यांच्या विविध संस्कृती, धर्म, आचारविचार याच्यात प्रचंड विरोधाभास असला तरी त्याला एकत्र जोडणारी एक नाळ आहे आणि त्यामुळे भारत हे जणू सप्तरंगी सुंदर असे वस्त्र आहे असेही म्हटले जाते. भारताची बहुसंख्य जनता छोट्या गावात राहणारी आहे. भारतीय संस्कृती मध्ये विवाह हा संस्कार मानला जातो आणि विवाहांनंतर कन्या सासरी राहायला जाते अशी प्रथा आहे.

येथेही भारताचे वैविध्य दिसून येते. कोण्या एके काळी कन्या भ्रूण हत्या आणि हुंडाबळी यासाठी बदनाम झालेल्या उत्तरप्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात एक गाव आहे ज्याला जावयाचे गाव अशी ओळख मिळाली आहे. वास्तविक या गावाचे नाव हिंगुलपूर असे आहे. पण गावात जन्म घेणाऱ्या मुली अकाली मारल्या जाऊ नयेत म्हणून या गावातील सर्व समुदायाने एक मताने मुलीना लग्नानंतर सुद्धा सासरी न पाठवता जावयालाच येथे राहायला आणण्याचा निर्णय घेतला आणि आज या गावात जावयांची तिसरी चौथी पिढी आनंदाने नांदते आहे. विशेष म्हणजे या गावात मुस्लीम वस्ती अधिक आहे आणि हा समाज सुद्धा हा नियम पाळतो.

विवाह ठरविताना जावयाने गावात राहायला यावे अशी मुख्य अट आहे. लग्नानंतर उपजीविकेसाठी जावयाला येथेच रोजगार मिळवून दिला जातो. समजा एखाद्या मुलीचे लग्न जमत नसेल तर तिला आर्थिक स्वातंत्र मिळावे म्हणून मुलीना शिक्षण दिले जाते आणि त्यात शिवण, विणकाम असेही शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली जाते. या प्रकारचे देशातील हे एकमेव गाव आहे.

अर्थात मध्यप्रदेशात नरसिंहपूर जिल्यातील बितली हे गाव सुद्धा असेच जावयाचे गाव आहे. तसेच झारखंड मध्ये जमाई पाडा नावाचे गाव असेच जावयाचे गाव आहे. १९६० मध्ये औद्योगिक कारखान्यातून काम करण्यासाठी कामगार कमी पडू लागले तेव्हा ती गरज या गावकऱ्यांनी आपापल्या जावयांना बोलावून पूर्ण केली असे सांगितले जाते. तीच प्रथा आजही पुढे सुरु आहे.

राजस्थानातील पालोद गावात लग्ने जमविताना ती गावातच जमविली जातात. म्हणजे मुली गावाबाहेर दिल्या जात नाहीत. यामुळे मुलगी नजरेसमोर राहतेच पण शेतीकाम, अडीअडचण, दुखणी खुपणी, मुलांचा सांभाळ अश्या जबाबदाऱ्या एकमेकांच्या मदतीने पार पाडता येतात. हरियाना मधील सौदापूर हेही असेच जावयाचे गाव आहे. महिला हिंसाचार वाढल्याने येथील लोकांनी मुलीचे लग्न ठरविताना जावयाचे गावात येऊन राहावे असा रिवाज सुरु केला आणि आजही तो सुरु आहे.