पितृपक्षात सुद्धा विराण आहे वाराणसीचे पिशाच कुंड

मोक्षाची नगरी वाराणसी येथील पिशाच कुंडावर पितृपक्ष काळात सुद्धा यंदा शुकशुकाट जाणवत आहे. करोनाचा फटका या घाटावर गकेल्या जाणारया श्राद्ध विधीनाही बसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक या काळात पिशाच मोचन कुंडावर अतोनात गर्दी असते पण यंदा मात्र हा घाट मोकळाच दिसून येत आहे.

देशात सध्या पितृपक्ष सुरु असून या पंधरवड्यात आपल्या मृत आप्तांना तर्पण देऊन त्यांना मोक्ष मिळावा या साठी विविध ठिकाणी श्राद्धपक्ष केले जातात. कोविड १९ साथीमुळे नदी घाटावर केल्या जाणारे हे कार्यक्रम सुरळीत पार पाडता यावेत यासाठी नियमात बदल केले गेले आहेत. काशी ही मोक्षनगरी मानली जाते. म्हणजे येथे शेवटचा श्वास घेणाऱ्याला मोक्ष मिळतो असा समज आहे. मोक्ष मिळण्याला भारतीय संस्कृती मध्ये मोठे महत्व आहे.

ज्यांचा अकस्मात मृत्यू ओढवला असेल त्यांचा आत्मा भटकत राहतो आणि अनेकदा त्याचे प्रियजन आणि नातेवाईकांना तो त्रास देतो असा समज असून या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून काशी येथील पिशाच मोचन कुंडावर त्रिपिंडी श्राद्ध करण्याची प्रथा आहे. गरुड पुराणात याचा उल्लेख येतो. त्रिपिंडी म्हणजे गेल्या तीन पिढ्यातील पितरांना पिंडदान. आत्म्याला शांती मिळण्यासाठी करावयाचा विधी. पिशाच म्हणजे भूत असा अर्थ असून पिशाच मोचन कुंडावर या काळात श्राद्ध करण्यासाठी परदेशातून सुद्धा लोक येतात असे येथील पुजारी पांडे यांचे म्हणणे आहे.

या घाटावर पिंडदान करण्यासाठी मुस्लीम सुद्धा येतात तसेच जपान, द.आफ्रिका, जर्मनी, अमेरिका येथूनही पर्यटक श्राद्ध विधी समजून घेण्यासाठी येतात. विशेष म्हणजे ऑनलाईनच्या दुनियेत असूनही हे श्राद्ध ऑनलाईन करता येत नाही तर ज्यांना श्राद्ध करायचे त्यांना स्वतः उपस्थित राहावे लागते असेही समजते.