चीनकडून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: भारतीय सैन्यदलाच्या दावा


नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

भारत- चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांनी गोळीबार केल्याचा आरोप करून चीन जगाची दिशाभूल करीत आहे. प्रत्यक्षात चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिक उपस्थित असलेल्या ठिकणांच्या दिशेने हवेत अंदाधुंद गोळीबार केला, असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शांततेसाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु असताना आंतराराष्ट्रीय करारांचा भंग करून चिनी सैन्याकडून आक्रमक कारवाया केल्या जात आहेत, अशी टीकाही निवेदनात करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दि. ७ सप्टेंबरच्या रात्री चिनी सैनिकांनी भारतीय चौकीच्या दिशेने पुढे येण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच चिनी सैनिकांनी त्यांच्या दिशेने धमकावण्याचा उद्देशाने गोळीबार केला. चिनी सैनिकांच्या या चिथावणीखोर कृत्यानंतरही भारतीय सैनिकांनी संयमाचे पालन करून आपल्या चौक्यांचे संरक्षण करण्याचे धोरण अवलंबिले, असे निवेदनात म्हटले आहे.

भारतीय सैन्य शांतता आणि विश्वासार्हता यासाठी ओळखले जाते. मात्र, देशाच्या अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे.