तिबेटी जवानाच्या अंत्यसंस्कारात राम माधव यांची उपस्थिती, चीनला कठोर संदेश


भारतीय सैन्य व लेह येथील तिबेटी समुदायाच्या नागरिकांना आज तिबेटी सैनिक नीमा तेन्झिन यांना शेवटचा निरोप घेतला. तेन्झिन हे गुप्त समूह असलेल्या स्पेशल फ्रंटियर फोर्स कमांडोमध्ये होते. ही फोर्स भारतीय सैन्याच्या अंतर्गत काम करते. ऑगस्ट महिन्यात तेन्झिन यांचा दक्षिण पेंगोंगमध्ये एका जुन्या सुरुंगच्या स्फोटात मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्य संस्कारात आज भाजपचे वरिष्ठ नेते आणि महासचिव राम माधव सहभागी झाले होते.

त्यांनी याचा एक फोटो देखील ट्विटरवर शेअर केला होता. मात्र नंतर ते ट्विट त्यांनी डिलीट केले. मागील आठवड्यातच चीन-भारत सैन्यात झालेल्या झडपनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने तिबेटी जवानाच्या अंत्य संस्कारात सहभागी होणे हे चीनला सडेतोड उत्तर देणे मानले जात आहे.

स्पेशल फ्रंटियर फोर्स हे दलाई लामा, तिबेट आणि भारतीय ध्वजाप्रती आपली वचनबद्धता दर्शवते. हे सैन्य पर्वतीय युद्धांमध्ये माहिर आहे. 1959 नंतर दलाई लामा यांच्यासह भारतामध्ये शरण घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना या फोर्समध्ये सहभागी करून घेतले जाते. या फोर्सबाबत अधिक माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. एका अंदाजानुसार यात 3500 पुरुष सैनिक आहेत.

भारत-चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने अशाप्रकारे तिबेटी जवानाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. एकप्रकारे यातून चीनला कठोर संदेश देण्यात आला आहे.