महिला अधिकाऱ्याला चेंडू मारल्याने नोव्हाक जोकोव्हिच यूएस ओपनमधून निलंबित

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचला यूएस ओपन स्पर्धेतून निलंबित करण्यात आले आहे. सामन्या दरम्यान लाईन जजला चेंडू मारल्याने जोकोव्हिचला डिसक्वालिफाय करण्यात आले. या घटनेनंतर जोकोव्हिचने माफी देखील मागितली.

यंदाच्या यूएस ओपन स्पर्धेत दिग्गज खेळाडू रोजर फेडरर आणि राफेल नडाल यांनी सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे जोकोव्हिचला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र अनावधनाने घडलेल्या चुकीमुळे जोकोव्हिचला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

जोकोव्हिच प्री-क्वार्टर फायनलच्या पाब्लो कार्रेनो बुस्टाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या राउंडमध्ये 6-5 ने पिछाडीवर होता. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्याने सर्व्हिस करण्याआधी रागात चेंडू लाइनकडे मारला व तो थेट लाईन जजला लागला. चेंडू महिला अधिकाऱ्याच्या गळ्याला लागल्याने त्या थेट जमिनीवर कोसळल्या. अधिकाऱ्याला श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता, मात्र नंतर त्या उठून तेथून निघून गेल्या.

अनावधनाने घडलेल्या या चुकीसाठी नियमांतर्गत जोकोव्हिचला अयोग्य घोषित करण्यात आले व कार्रेनोला विजेते घोषित केले. या घटनेनंतर जोकोव्हिचने माफी देखील मागितली.