अहमदाबादचा ‘मिनी पाकिस्तान’ असा उल्लेख करत संजय राऊत यांनी गुजरातचा अपमान केला – भाजप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तान करत गुजरातचा अपमान केला असून, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी गुजरात भाजपने केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्या मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. यानंतर कंगनाला उत्तर देताना चिडलेल्या संजय राऊत यांनी तिचा ‘हरामखोर’ असा उल्लेख केला. राऊत यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी होऊ लागली आहे.

यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले होते की, जर त्या मुलीने (कंगना) महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी देखील माफी मागण्याचा विचार करेल. तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटले. हेच अहमदाबादला म्हणण्याची तिची हिंमत आहे का ? संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता गुजरात भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

गुजरात भाजपचे प्रवक्ते भरत पांड्या म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्याने अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणून गुजरातचा अपमान केला आहे. त्यांनी गुजरात, अहमदाबाद आणि येथील नागरिकांची माफी मागायला हवी. शिवसेनेने गुजरात, गुजराती आणि येथील नेत्यांना घृणा, द्वेषाच्या भावनेने निशाण्यावर घेणे बंद करायला हवे.

Loading RSS Feed