लोक मरत आहेत, मात्र मोदी मोरांना दाणे खाऊ घालत आहेत, काँग्रेसची जोरदार टीका


देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, दररोज 90 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. भारताने रुग्ण संख्याच्या बाबतीत ब्राझील देखील मागे टाकले असून, सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणारा भारत हा दुसरा देश आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून, कोरोनाचे युद्ध सुरूच आहे, मात्र सेनापती गायब झाले असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात कोरोनाच्या लढाईसाठी 21 दिवस पुरेसे असल्याचे म्हटले होते. परंतू, आज 166 दिवसांनंतर देखील देश कोरोनाचे महाभारत पाहत आहे. लोक मरत आहेत आणि मोदीजी मोराला दाने टाकत आहेत.

सुरजेवाला म्हणाले की, जेव्हा रोम जळत होता त्यावेळी निरो बासरी वाजवत होता. त्याचप्रमाणे देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे आणि मोदी मोराला दाने खायला घालत आहेत. ज्याप्रमाणे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला, देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा तुघलकी निर्णय समजला जाईल.

मोदींवर टीका करताना सुरजेवाला म्हणाले की, कोरोनाशी युद्ध तर सुरू आहे. मात्र सेनापती गायब आहेत. कोरोनाच्या लढाईत मोदी सरकार पुर्णपणे निकम्मी आणि नाकारा सिद्ध झाली आहे. कंगना आणि शिवसेना वादावर देखील सुरजेवाला म्हणाले की, नितीश कुमार आणि भाजपकडे बिहारमधील पुर आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये दाखवलेल्या हलगर्जीपणासाठी काहीही उत्तर नाही. मूळ समस्यापासून लक्ष भटकवण्यासाठी त्यांच्याकडे सुशांत आणि रियाचे प्रकरण आहे.