जीडीपीचे आकडे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा – रघुराम राजन

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यस्थेची स्थिती वाईट आहे. जीडीपी दर उणे 23.9 टक्क्यांनी घसरला आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या आकड्यावरून सर्वांनी सावध होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. राजन यांनी आपल्या लिंक्डइन पेजवरील पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा इनफॉर्मल क्षेत्रातील आकडे जोडले जातील, तेव्हा अर्थव्यवस्थेतील घसरण अधिक वाईट असेल. भारतीय अर्थव्यस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

राजन म्हणाले की, जोपर्यंत व्हायरसवर नियंत्रण मिळवले जात नाही तोपर्यंत भारतात विवेकी खर्चाची (discretionary spending) स्थिती कमकुवत असेल. सरकारने आतापर्यंत जो निधी दिला आहे, तो पुरेसा नाही. सरकार भविष्यात प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी आज संसधान वाचविण्याच्या रणनितीने चालत आहे, जे धोकादायक आहे. सरकारी अधिकारी विचार करत आहेत की व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतर मदत निधी पॅकेज देता येईल, मात्र ते स्थितीला गंभीरतेने घेताना दिसत नाहीत. तोपर्यंत अर्थव्यस्थेचे मोठे नुकसान होईल.

राजन म्हणाले की, मदत निधीशिवाय लोक जेवण सोडून देतील, मुलांना शाळेतून काढतील आणि त्यांना काम करणे किंवा भीक मागण्यासाठी पाठवतील. कर्ज घेण्यासाठी सोने गहाण ठेवतील, ईएमआय आणि घराचे भाडे वाढत जाईल. कंपन्यांवरील कर्ज वाढल्यानंतर त्या देखील बंद होतील. जोपर्यंत व्हायरस निंयत्रणात येईल, तोपर्यंत अर्थव्यवस्था उध्वस्त झालेली असेल.