आता कुरापतखोर चीनने अरुणाचल प्रदेशवर ठोकला दावा


भारत-चीनमध्ये मागील अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. यातच आता चीनने अरुणाचल प्रदेशवर दावा ठोकला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन म्हणाले की, चीनने कधीच अरुणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही. जो एक दक्षिण तिबेटचा भाग आहे.

याशिवाय काही दिवसांपुर्वी अरुणचल प्रदेशमधून 5 भारतीय नागरिकांचे चीनी सैनिकांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. झाओ लिजिनने याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेशमधील 5 युवकांच्या अपहरणाचा तपास करण्यासाठी एका पोलीस टीमला मॅकमोहन लाईनला लागून असलेल्या सीमा भागात पाठवण्यात आले आहे. ही लाईन सुबनसिरी जिल्ह्यातून तिबेटला जोडते. या युवकांचे चीनी सैनिकांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी भारतीय सैन्याने पाठवलेल्या निवेदनाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. सोबतच चीनने अरुणाचल प्रदेशला कधीच मान्यता दिली नसल्याचे म्हटले आहे.